Pakistan 10-wicket win against England in 2nd T20I - पाकिस्तानने गुरुवारी कराची स्टेडियमवर इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात २०० धावांचे लक्ष्य बाबर आजम व मोहम्मद रिझवान या जोडीने सहज पार केले. पाकिस्तानने १० विकेट्स राखून सामना जिंकताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकही विकेट न गमावता मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम नावावर केला. बाबरने ६६ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ११० धावा करताना त्याचे २६वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. रिझवानने ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा केल्या.
इंग्लडचे २०० धावांचे लक्ष्य बाबर व रिझवान या जोडीने सहज पार केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०३ धावांची ही भागीदारी धावांचा पाठलाग करतानाची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०२१मध्ये बाबर व रिझवान यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९७ धावा जोडल्या होत्या. बाबरने या खेळीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा ओलांडताना विराट कोहलीचा विक्रम मोडला. बाबरने २१८ इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठला, तर विराटला २४३ इनिंग्ज खेळाव्या लागल्या होत्या. या विक्रमात ख्रिस गेल २१३ इनिंग्जसह अव्वल स्थानावर आहे.
पाकिस्तानच्या या विजयाचे इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन याने कौतुक केले. माजी जलदगती गोलंदाज वासीम अक्रम यानेही बाबर व रिझवान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पण, शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) या विजयाच्या आडून पुन्हा एकदा भारतीय संघाला डिवचले. मागच्या वर्षी अशाच पद्धतीने आम्ही भारताला पराभूत केले होते असे विधान त्याने केले. ''एकही विकेट न गमावता विजय मिळवला, ही पाकिस्तानची खासियत आहे. हे पाकिस्तानने याआधीही केले आहे. पाकिस्तानने इसी तरह पिछले साल इंडिया को मारा था ( मागच्या वर्षी असाच विजय पाकिस्तानने भारताविरुद्ध मिळवला होता),''असे तो म्हणाला...