Asia Cup 2022, PAK vs AFG: भारतीय संघाचे आशिया चषकातील भवितव्य अवलंबून असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी टीम इंडियाचे टेन्शन वाढवले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांना २० षटकांत केवळ १२९ धावाच करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी १३० धावांची आवश्यकता असणार आहे. अफगाणिस्तानच्या संघाकडून फलंदाजांनी चांगली सुरूवात मिळवून दिली होती, पण पाकिस्तानी गोलंदाजांनी त्यांना बांधून ठेवलं. त्यामुळे एकाही अफगाणिस्तानच्या फलंदाजाला चाळीशी गाठता आली नाही. इब्राहिम झाद्रानने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर पाकिस्तानच्या नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी अप्रतिम भेदक मारा केला. भारताला या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर अफगाणिस्तानचा या सामन्यात विजय अनिवार्य आहे.
पाकिस्तानच्या संघाने गेल्या सामन्यात भारताला पराभूत केले होते, त्यामुळे त्यांनी संघात बदल केला नाही. पण अफगाणिस्तानने मात्र दोन महत्त्वाचे बदल केले. अजमतुल्ला उमरझाई आणि फरीद अहमद या दोन खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. हे दोन गोलंदाज आज पाकिस्तानी फलंदाजांना रोखू शकतात का, याकडे अफगाणिस्तानच्याच नव्हे, तर भारतीय चाहत्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.
अफगाणिस्तानचा संघ- हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, फरीद अहमद, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी
पाकिस्तानचा संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ, मोहम्मद हसनैन