नॉटिंगहॅम : ‘भारताविरुद्ध विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला सुरुवातीलाच बळी घ्यावे लागतील आणि त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळालेल्या विजयापासून प्रेरणा घेऊन मैदानात उतरावे लागेल,’ असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने व्यक्त केले. वकारने आयसीसीसाठी आपल्या स्तंभात लिहिले, ‘पाकिस्तानला स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर भारताविरुद्ध ‘ए प्लस’ कामगिरी करून जिंकावे लागेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच मोठा असतो; परंतु आता रविवारी होणारा हा सामना महत्त्वाचा झाला आहे.’ विश्वचषक स्पर्धेत भारताने नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली आहे. या विक्रमाला वकार युनूसने जास्त महत्त्व न देता म्हटले की, ‘पाकिस्तानला २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीपासून प्रेरणा घ्यावी लागेल. त्यात फायनलमध्ये त्यांनी भारताला हरवले होते.’ तो पुढे म्हणाला, ‘पाकिस्तानने या सामन्यातून प्रेरणा घेऊन सकारात्मक विचाराने खेळायला हवे. मी विश्वचषकात आतापर्यंत पाहिले की, सुरुवातीला विकेटस् न घेतल्यास अडचण होते. नवीन चेंडू महत्त्वाचा आहे आणि सलामीवीरांना पहिल्या दहा षटकांत खूप सावध खेळावे लागत आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत पाकिस्तानने निराश केले.’