न्यूझीलंडच्या ताफ्यातील स्टार बॅटर केन विलियम्सन याने पाकिस्तानच्या लाहोर शहरातील गद्दाफी स्टेडियमवर दमदार शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात केन विलियम्सन याने वनडे कारकिर्दीतील १४ शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सेट केलेल्या ३०५ धावांचा पाठलाग करताना केनच्या भात्यातून दमदार शतक आले. त्याने अवघ्या ७२ चेंडूत शतक साजरे केले. हे वनडे कारकिर्दीतील त्याचे दुसरे सर्वात जलद शतक आहे. या शतकासह त्याने एबी डिव्हिलियर्सच्या शतकांच्या विक्रमाशीही बरोबरी साधलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एबी डिव्हिलियर्सच्या शतकी विक्रमाशी बरोबरी
केन विलियम्सन याने कसोटीत ३३ शतके झळकावली आहेत. वनडेतील १४ व्या शतकासह आता आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याच्या खात्यात ४७ व्या शतकाची नोंद झाली. ३६५ व्या सामन्यात त्याने ही कामगिरी करून दाखवलीये. यासह त्याने एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४२० सामन्यात ४७ शतके झळकावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन एबीसह संयुक्तरित्या १४ व्या स्थानावर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह सर्वात आघाडीवर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाला भिडण्याआधी केन आला रंगात
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाच्या गटात आहे. २ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याआधी केन विलियम्सन रंगात आल्याचे दिसत आहे. पाकिस्ताननच्या मैदानात त्याने शतकी तोरा दाखवून देत आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धमाका करण्याचे संकेत दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात ११३ चेंडूत १३३ धावांची नाबाद खेळी करत केन विलियम्सन याने संघाला सहज विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने १३ चौकारआणि २ षटकारही मारले.
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या खेळाडूंची यादी
सचिन तेंडुलकर (भारत) - सामने: ६६४, शतके: १००विराट कोहली (भारत) - सामने: ५४४, शतके: ८१रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - सामने: ५६०, शतके: ७१कुमार संगकारा (श्रीलंका) - सामने: ५९४, शतके: ६३जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - सामने: ५१९, शतके: ६२हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका ) - सामने: ३४९, शतके: ५५महेला जयवर्धने (श्रीलंका) - सामने: ६५२, शतके: ५४ब्रायन लारा (वेस्ट इंडीज) - सामने: ४३०, शतके: ५३जो रूट (इंग्लंड) - सामने: ३५७, शतके: ५२रोहित शर्मा (भारत) - सामने: ४९३, शतके: ४९डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - सामने: ३८३, शतके: ४९राहुल द्रविड (भारत) - सामने: ५०९, शतके: ४८स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - सामने: ३४८, शतके: ४८एबी डिव्हिलियर्स (आफ्रिका/दक्षिण आफ्रिका) - सामने: ४२०, हड्रेड्स: ४७केन विल्यमसन (न्यूझीलंड) - सामने: ३६५; शतके: ४७