चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तानच्या मैदानात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या तीन देशांत तीरंगी मालिका खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यातील ३०० पारच्या लढाईत न्यूझीलंडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेला शह देत या स्पर्धेचं फायनल तिकीट बूक केले. आता दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील विजय मिळवणारा संघ या स्पर्धेतील दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी बॅटिंग कोच अन् आता फिल्डिंग कोच मैदानात उतरुन करताना दिसला फिल्डिंग
त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमधील दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात दिसलेला सीन चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डिंग कोचला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली. कमालीचा योगायोग हा की, याच संघानं याआधी बॅटिंग कोचकडून फिल्डिंग करून घेतल्याचा सीन पाहायला होता. हा क्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गल्ली क्रिकेटमधील झलक दाखवणारा असाच होता.
आंतरराष्ट्रीय सामन्यात गल्ली क्रिकेटमधील सीन
गल्ली क्रिकेटमधील स्पर्धांमध्ये बहुतांश वेळा स्पर्धेत सहभागी होणारा संघ ११ गडी नसताना स्पर्धेला हजेरी लावतो. मग आमच्या एक दोन फिल्डर कमी आहे म्हणत स्पर्धा भरवणाऱ्या कमिटीकडेच कमी असलेल्या खेळाडू देण्याची मागणी करतो. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात अगदी असाच काहीसा सीन घडला. फरक फक्त एवढाच होता की, आयोजकांकडे फिल्डर मागण्याऐवजी फिल्डिंग कोचलाच फिल्डिंगला यावे लागले.
फिल्डिंगचे धडे देणारा फिल्डिंग करायला आला, आंतरारष्ट्रीय सामन्यातील सीन व्हायरल
१० फेब्रुवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामना रंगला होता. या सामन्यात फिल्डिंग कोच वांडिले ग्वावु याच्यावर क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली. न्यूझीलंडच्या डावातील अखेरच्या काही षटकात दक्षिण आफ्रिकेला फिल्डिंगचे धडे देणारा कोचच फिल्डिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. फिल्डर्सचा तुटवडा असल्यामुळे संघावर ही वेळ आली. कोचचा फिल्डिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
दक्षिण आफ्रिकेवर पाच महिन्यांत दुसऱ्यांदा आली ही वेळ
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ खेळाडूंसह मैदानात उतरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचा भाग असणारे अनेक खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमुळे अद्याप पाकमध्ये पोहचलेले नाहीत. एक खेळाडू दुखापतीमुळे आधीच बाहेर होता. त्यात बदली खेळाडूची गरज भासल्यामुळे फिल्डिंग कोचलाच मैदानात उतरावे लागला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पाच महिन्यात दुसऱ्यांदा कोचला बदली खेळाडूच्या रुपात वापर केल्याचे पाहायला मिळाले. याआधी आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात बॅटिंग कोच जेपी ड्युमिनी फिल्डिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.