बुलावायो (जिम्बाब्वे) : झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या फखर झामनने द्विशतक रचले. द्विशतक रचणारा पाकिस्तानचा तो पहिला द्विशतकवीर ठरला. पण त्याचबरोबर पाकिस्तानने या सामन्यात एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे आणि हा विश्वविक्रम रचला आहे तो पाकिस्तानच्या सलामीवीरांनी.
झामन आणि इमाम उल हक या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 304 धावांची भागीदारी रचत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात झामनने नाबाद 210 धावांची खेळी साकारली, तर इमामने 113 धावा केल्या आणि झामनला चांगली साथ दिली. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात 399 धावांचा डोंगर उभारता आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी हा विश्वविक्रम श्रीलंकेच्या सलामीवीरांच्या नावावर होता. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आण उपुल थरंगा या सलामीवीरांनी 2006 साली लीड्स येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात 284 धावा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 12 वर्षांनी हा विश्वविक्रम पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मोडीत काढला आहे.