जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूंची इच्छा असते. जगभरातील क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळून आपली नवीन ओळख निर्माण करतात. मात्र, भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना या स्पर्धेत स्थान नाही. २००८ नंतर एकदाही शेजाऱ्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही ती आजवर तशीच आहे. पण, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
"प्रत्येक खेळाडूला वाटते की आपण आयपीलमध्ये खेळायला हवे... माझी देखील त्या लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. आयपीएल जगातील सर्वात मोठ्या लीगपैकी एक आहे. जर मला भविष्यात तिथे खेळण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच खेळेन", असे हसन अलीने सांगितले. आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. शोएब मलिक, शोएब अख्तर, कामरान अकमल, सोहेल तन्वीर आणि शाहिद आफ्रिदी हे पाकिस्तानातील नामांकित खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत. तन्वीर २००८ मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. मात्र, या हंगामानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली.
मुंबईवरचा हल्ला अन् पाकिस्तानी खेळाडूंचे दरवाजे बंद नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर भारताने शेजाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली. पाकिस्तानसोबतचा व्यापार, आर्थिक संबंध आणि जवळपास सर्वच बाबी बंद झाल्या होत्या. आयपीएलमध्ये खेळण्यास देखील पाकिस्तानी खेळाडूंना विरोध करण्यात आला, ज्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडूंना बंदी घातली. तेव्हापासून शेजारील देशातील खेळाडू आयपीएलपासून दूर आहेत. आगामी काळात पाकिस्तानी संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून या संघात हसन अलीला स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)