२००८ नंतर पाकिस्तानी खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली गेली. आयपीएलच्या पहिल्या हंगामातच पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. पण, त्यानंतर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध भारताने तोडले अन् पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणेही बंद केले. पण, आता आयपीएल २०२४ मध्ये पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर ( Mohammad Amir ) खेळताना दिसू शकतो. मोहम्मद आमीरने ब्रिटीश नागरिक असलेल्या मुलीशी लग्न केलं आहे आणि त्याला आता ब्रिटिश पासपोर्ट मिळू शकतो. अशात तो आयपीएलमध्येही खेळण्यासाठी पात्र ठरू शकतो.
आमीरला फिक्सिंगच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती आणि त्या दरम्यान त्याची भेट ब्रिटीश महिला वकिलाशी झाली अन् तो प्रेमात पडला. २०२० मध्ये आमीर लंडनमध्ये स्थायिक झाला आणि आणखी एका वर्षानंतर तो ब्रिटिश पासपोर्टसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या या माजी गोलंदाजाने याबाबत त्याचे मत मांडले.
''ब्रिटिश पासपोर्टसाठी मला एक वर्ष बाकी आहे. पण, सद्यस्थितीत आयपीएलसाठी काय सिनारियो आहे, याची मला कल्पना नाही. मी स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहे. एका वर्षानंतर मी कुठे असेल हे मलाही माहित नाही. कोणालाच त्यांचे भविष्य सांगता येत नाही. जेव्हा मला पासपोर्ट मिळेल, तेव्हा मी सर्वोत्तम संधीचा नक्की विचार करेन,''असे आमीर म्हणाला. पण, यावेळी मोहम्मद आमीरने यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा कोणताच विचार नसल्याचे स्पष्ट केले. ''मी इंग्लंडसाठी खेळणार नाही. मी याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहे. मी पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलोय,'' हेही तो म्हणाला.
२०१० च्या इंग्लंड दौऱ्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आमीर दोषी आढळला होता आणि त्याच्यावर पाच वर्षांच्या बंदीची शिक्षा घातली गेली होती. २०१५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले. आमीरने पाकिस्तानकडून ३६ कसोटी, ६१ वन डे व ५० ट्वेंटी-२० सामन्यांत एकूण २५९ विकेट्स घेतल्या आहेत.