नवी दिल्ली : एकिकडे आशिया चषकाचा थरार सुरू असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल खानने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २०१५ च्या विश्वचषकात भारताविरूद्ध पाच बळी घेऊन सोहेल खानने प्रसिद्धी मिळवली होती. त्याने २०१५ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड येथे ५५ धावा देत पाच बळी पटकावण्याची किमया साधली होती.
सोहेलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
सोहेलने २० जानेवारी २००८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९ कसोटी सामन्यांच्या १७ डावात ३.६९ च्या सरासरीने २७ बळी घेतले. त्याने वन डे क्रिकेटमध्ये १३ सामन्यांमध्ये ५.३७ च्या सरासरीसह १९ बळी घेतले आहेत. ५/५५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सोहेलने म्हटले, "माझ्या जवळच्या लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, माझे कुटुंब, प्रशिक्षक, मार्गदर्शक, संघातील सहकारी, चाहते आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन."