Join us  

'उम्रान मलिकसारखे आमच्या गल्लीबोळात मिळतील'; विराटचा 'बाप' काढणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचं वादग्रस्त विधान

भारतीय संघाचा नवा सुपरस्टार उम्रान मलिक ( Umran Malik) याला वेगाचा बादशाह म्हणून ओळखले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 4:02 PM

Open in App

भारतीय संघाचा नवा सुपरस्टार उम्रान मलिक ( Umran Malik) याला वेगाचा बादशाह म्हणून ओळखले जात आहे. 150kmph च्या वेगाने चेंडू टाकणे हे त्याच्यासाठी काही नवं नाही आणि या वेगाने चेंडू टाकणारा तो भारतीय संघातील सध्या एकमेव गोलंदाज आहे. उम्रानला पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याचा विक्रम मोडायचा आहे. २५ वर्षीय उम्रानने भारतासाठी ८ वन डे व ८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि २४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची धावा देण्याची सरासरी जरा महाग असली तरी भारतीय संघाचा तो विकेट टेकर गोलंदाज आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पत्नींची 'खुबसुरती'; शाहिनची बायको जणू बार्बी डॉल! 

उम्रानची केवळ भारतीय क्रिकेट वर्तुळातच नव्हे तर परदेशातील दिग्गजांमध्येही चर्चा आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या डेल स्टेनचेही मार्गदर्शन उम्रानला लाभले आहे. पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रम याचाही त्याला सपोर्ट आहे. जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रेट ली याने उम्रानची तुलना फेरारी गाडीशी केली आहे. पण, एवढे दिग्गज उम्रानचं कौतुक करत असताना पाकिस्तानचा माजी गोलंदाज सोहैल खान ( Sohail Khan) याच्या पोटात दुखू लागले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी याच सोहैल खानने प्रसिद्धीसाठी भारताचा दिग्गज विराट कोहली याचा बाप काढला होता. आता त्याने उम्रानची तुलना पाकिस्तानातील स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या गोलंदाजांशी केली आहे.

''उम्रान मलिक हा चांगला गोलंदाज आहे, १-२ सामन्यांत मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे. तो वेगाने पळतो आणि चांगली गोलंदाजी करतो. परंतु तुम्ही १५०-१५५ kph च्या वेगवान गोलंदाजांबाबत चर्चा करत असाल तर असे १२-१५ गोलंदाज सध्या आमच्या गल्लीबोळात खेळत आहेत. तुम्ही लाहोर कलंदर्स आयोजित केलेली निवड चाचणी पाहिली असती तर तुम्हाला असे अनेक गोलंदाज दिसले असते,''असे सोहैल खान म्हणाला. 

''उम्रान जैसे तो हमारे यहाँ बहोत है! स्थानिक क्रिकेटमध्ये तर अशा गोलंदाजांचा भरणा आहे. याच स्थानिक क्रिकेटमधून शाहीन, नसीम शाह, हॅरीस रौफ हे गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले आहेत. असे मी अनेक नावं सांगू शकतो,''असेही खान म्हणाला. शोएब अख्तरच्या १६१.३ kphचा विक्रम मोडण्याच्या उम्रानच्या इच्छेबाबतही खानने त्याचे मत मांडले. तो म्हणाला,''शोएबचा विक्रम बॉलिंग मशीनच तोडू शकते, हे व्यक्तीचं काम नाही. त्यासाठी शोएबसारख्या अथक मेहनतीची गरज आले.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपाकिस्तान
Open in App