Jay Shah, India vs Pakistan: भारतीय क्रिकेट संघ हा सध्याच्या घडीला खेळाच्या बाबतीत अप्रतिम आहेच. त्यासोबतच लोकप्रियतेच्या बाबतीतही टीम इंडिया आघाडीवर आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे संघाच्या पाठिशी असलेले सक्षम भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI. भारतीय क्रिकेट बोर्ड हे एक श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. क्रिकेट जगतात BCCI चा दबदबा आहे. अशातच भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध चांगले नसल्याने भारतीय संघ क्रिकेट खेळण्यास पाकिस्तानात जात नाही. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारताने पाकिस्तानात यावे असा आग्रह पाक क्रिकेट बोर्डाने धरला आहे. त्यावर भारताने स्पष्ट नकार दिला आहे. पण याच दरम्यान, BCCI चे सचिव जय शाह यांच्याबाबतीत एक बातमी मिळत आहे. या वृत्तानुसार, जय शाह यांची जागा आता एक पाकिस्तानी पदाधिकारी घेणार असल्याची चर्चा आहे.
BCCI सचिव जय शाह हे २०२१ पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. ते गेल्या काही काळापासून संपूर्ण आशियातील क्रिकेटसाठी चांगले काम करत आहे. मात्र त्यांचा कार्यकाळ या वर्षाच्या अखेरीस संपणार आहे. अशा परिस्थितीत आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून जय शाह यांची जागा कोण येणार, याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या शर्यतीत पाकिस्तानचा पदाधिकारी आघाडीवर आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वी यांना ACC चे नवे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष नक्वी यांना रोटेशन धोरणानुसार एसीसीचे नवे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता आहे. नुकतीच एसीसीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यामध्ये नक्वी पुढील अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. या वर्षाच्या अखेरीस ACC ची बैठक होईल. त्यात या विषयावर निर्णय घेतला जाणार आहे.
जानेवारी २०२१ मध्ये जय शाह पहिल्यांदा ACC चे अध्यक्ष बनले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्या जागी त्यांनी हे पद स्वीकारले. त्यानंतर २०२४ च्या सुरुवातीला जय शहा यांना त्यांच्या कार्यकाळासाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. याच दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) फेब्रुवारी २०२४ मध्ये मोहसिन नक्वी यांना तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.