पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी सराव सामनेही खेळवले जात आहेत. नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ कांगारूंशी भिडत आहे. वन डे विश्वचषक २०२३ मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघरचना बदलली. विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. याचाच बदला आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात घेऊ, असा इशारा पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार अहमदने दिला आहे. पाकिस्तानचा फिनिशर म्हणून ओळख असलेल्या अहमदला कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
भारताच्या तुलनेत पाकिस्तान मजबूत संघ - अहमदपाकिस्तानी संघ वन डे विश्वचषक २०२३ मधील बदला भारताला ट्वेंटी-२० विश्वचषकात पराभूत करून घेईल असा विश्वास इफ्तिखार अहमदने व्यक्त केला. तो पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. त्याने सांगितले की, वन डे विश्वचषकात आमचा पराभव झाला असला तरी ट्वेंटी-२० मध्ये आमचा संघ भारतापेक्षा चांगला आहे. होय, आम्ही नक्कीच या पराभवाचा बदला घेऊ आणि भारताला चीतपट करू. कारण आमच्या संघात बाबर आझमसारखा वर्ल्ड क्लास फलंदाज आहे, १५० च्या गतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. भारताविरूद्ध आक्रमक क्रिकेट खेळून विजय मिळवला जाऊ शकतो. त्यासाठी मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल, असेही इफ्तिखारने सांगितले.
दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ मध्ये दोन विजय मिळवल्यानंतर शेजाऱ्यांना यजमान भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून पाकिस्तानला २०० च्या आत गुंडाळले. प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावा करून पाकिस्तानला घाम फोडला अन् शेजाऱ्यांचा पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)