नवी दिल्ली : आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांना त्यांची जागा दाखवून भारतीय संघाने यजमानांना पराभवाची धूळ चारली. साखळी फेरीत जेव्हा हे प्रतिस्पर्धी भिडले तेव्हा पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. पण, सुपर ४ मध्ये रोहितसेनेने बाबर आझमच्या संघाला चोख प्रत्युत्तर दिले. घातक गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानला रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी सळो की पळो करून सोडले. २२८ धावांच्या विक्रमी फरकाने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. अशातच कर्णधार बाबर आझमचा प्रतिस्पर्धी इमाद वसीमने मोठे विधान केले असून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
क्रिकेट पाकिस्तान या पोर्टलशी बोलताना इमाद वसीमने सांगितले की, मला वन डे क्रिकेट खेळायचे असून संधीच्या प्रतीक्षेत आहे. पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नेहमीच तयार आहे. भारताविरूद्ध खेळणे ही एक मोठी बाब असून भारताला त्यांच्या धरतीवर पराभूत केल्यास आत्मविश्वास वाढेल. २०१६ मध्ये मला भारताविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली पण आम्ही विजय मिळवू शकलो नाही. भारतीय खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक मदत मिळते. त्यामुळे त्यांना त्यांच्याच घरात पराभूत करायला आवडेल.
आशिया चषकाची स्पर्धा पार पडल्यानंतर ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. यजमान भारतीय संघ आपल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडेल. तर, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू