Shoaib Malik Fixing: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक मागील काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन तिसरे लग्न केले. शोएब आणि पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद विवाहबंधनात अडकले आहेत. सध्या बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळत असलेला मलिक एका प्रकरणामुळे अडचणीत आला आहे.
एकाच षटकात तीन नो बॉल टाकल्यानंतर शोएब मलिकची सर्वत्र चर्चा रंगली. फिक्सिंगची देखील चर्चा सुरू झाली होती. फिरकीपटू असताना तीन नो बॉल यावरून त्याला लक्ष्य करण्यात आले. फिक्सिंगच्या संशयामुळे फ्रँचायझीने शोएब मलिकचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या माध्यमांनी हा दावा केला आहे. त्यामुळे मलिक बांगलादेश सोडून दुबईकडे कूच करेल.
मलिकची BPL मधून हकालपट्टी
शोएबने या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सर्व सामने खेळले, पण त्याला साजेशी देखील कामगिरी करता आली नाही. आता त्याची जागा अहमद शहजाद घेणार आहे. मागील आठवड्यात मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १३,००० धावा करून एक मोठा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो आशियातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. फॉर्च्युन बारिशाल आणि रंगपूर रायडर्स यांच्यातील सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये २२ जानेवारी रोजी फॉर्च्युन बरीशाल आणि खुलना टायगर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात शोएब फॉर्च्युन बरीशालकडून खेळत होता. त्याने फक्त एकच षटक टाकले जे संपूर्ण सामन्यातील सर्वात महागडे षटक ठरले. मलिकने या षटकात ३ नो बॉल टाकले आणि १८ धावा दिल्या. त्याच्या या गोलंदाजीच्या प्रयत्नानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला गेला. आता या आरोपांमुळे मलिकच्या अडचणी वाढल्या आहेत.
Web Title: pakistan player Shoaib Malik's Bangladesh Premier League contract terminated after suspicious no-balls, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.