पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (PM Imran Khan) यांनी अजब दावा केलाय. भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा पाकिस्तानचे क्रिकेटपटू अधिक गुणवान असल्याचं तर्कट इमरान खान यांनी मांडलं आहे. पाकिस्तानच्या कसोटी संघानं नुकतंच दक्षिण आफ्रिकेवर (Pakistan vs South Africa) मात करुन कसोटी मालिका जिंकली. पाकच्या या विजयाचं कौतुक करताना माजी क्रिकेटपटू राहिलेल्या इमरान खान यांनी भारतीय क्रिकेट संघावर टीका केली आहे. (Pakistan PM Imran Khan Says Pakistan Has More Talent Than India)
"पाकिस्तानात भारतापेक्षा अधिक टॅलेंट आहे. भारताचा क्रिकेट संघ सध्या आमच्यापेक्षा पुढे आहे कारण त्यांच्या क्रिकेटचा साचा खूप चांगला आहे. आम्हीही पाकिस्तानच्या क्रिकेटची रचना सुधारत आहोत आणि आम्हाला आशा आहे की पुन्हा एकदा पाकिस्तानचा क्रिकेट संघ जगात अव्वल स्थानी असेल", असं इमरान खान यांनी म्हटलं आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या केवळ एका मालिका विजयावरुन हुरळून गेलेल्या पंतप्रधान इमरान खान यांनी इथं एक गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही. ती म्हणजे पाकिस्तानने त्यांच्या मायभूमीत हा विजय प्राप्त केला आहे. तर भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिका ऑस्ट्रेलियाच्या मैदानात जाऊन जिंकली होती. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाला नुकतंच न्यूझीलंड दौऱ्यात सपाटून मार खावा लागला होता.
भारतीय संघाशी तुलना करणं योग्य आहे का?
पाकिस्तानच्या कसोटी संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विजय प्राप्त केला असला तरी या संघाची पाकिस्तानच्या बाहेरील कामगिरी काही चांगली राहिलेली नाही. पाकिस्तानला न्यूझीलंड दौऱ्यात एकही सामना जिंकता आला नाही. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम सलग दोनवेळा केला आहे. त्यामुळे मायभूमीत जिंकलेल्या एका कसोटी मालिकेवरुन पाकिस्तानच्या संघाची थेट भारतीय संघाशी तुलना करणं कितपत योग्य आहे? असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
Web Title: Pakistan PM Imran Khan Says Pakistan Has More Talent Than India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.