नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानच्या धरतीवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली होती. तर गुरूवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने मोठा विजय मिळवून जोरदार कमबॅक केला आहे. कराची येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने 10 बळी राखून मोठा विजय मिळवला. कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) शतकी खेळी केली तर मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 88 धावांची आक्रमक खेळी केली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून 199 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने सहज आव्हानाचा पाठलाग केल्याने पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी सलामी जोडीचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे पतंप्रधान शहबाज शरीफ यांनी बाबर-रिझवानच्या जोडीचे कौतुक करताना भारताला डिवचलं आहे. कालच्या सामन्यात बाबर 110 धावा करून नाबाद राहिला. हे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले आहे. लक्षणीय बाब म्हणजे टी-20 क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकणारा बाबर पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.
बाबर-रिझवानचे केले कौतुक पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सामना झाल्यानंतर ट्विटच्या माध्यमातून लिहले की, "152/0 आणि आता 203/0. बाबर आणि रिझवानचे अभिनंदन." शरीफ यांनी मागील टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचा दाखला देत भारताला डिवचलं आहे. विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरूद्ध 10 बळी राखून विजय मिळवला होता. तेव्हाही बाबर-रिझवानच्या जोडीने 152 धावांचा सहज पाठलाग करून विजय मिळवला होता. पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच विश्वचषकात भारतीय संघाला पराभूत करण्यात यशस्वी झाला होता. यावरून शरीफ यांनी भारतावर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानचा मोठा विजय पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानच्या संघाला 200 धावांचे तगडे आव्हान दिले होते. इंग्लंडकडून कर्णधार मोईन अलीने नाबाद 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र पाकिस्तानच्या सलामी जोडीने आक्रमक खेळी करून इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला. बाबर-रिझवानच्या जोडीने सुरूवातीपासून मोठे फटकार मारण्यास सुरूवात केली होती. अखेर बाबर आझम (110) आणि मोहम्मद रिझवान (88) यांनी नाबाद खेळी करून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.