जसं दिसतं तसं नेहमीच असेलच असं नाही.... आम्ही ह्याव करू, त्याव करू अशी गर्जना देत पाकिस्तानचा संघ भारतात आला खरा, परंतु त्यांच्या मनात एका भीतीने घर केलं होतंच.. आशिया चषकाचे यजमानपद हातचं गेल्याने खवळलेल्या पाकिस्तानकडूनवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला हरवून जेतेपद पटकावू अशी बतावणी केली गेली. आमच्याकडे नंबर वन बाबर आजम आहे, मोहम्मद रिझवान आहे, शाहिन आफ्रिदी, हॅरीस रौफ, नसीम शाह, शादाब खान आहेत.. पण, त्यांचा काहीच उपयोग झाला नाही हे हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झाले... पाकिस्तान नेहमीच इतरांवर अवलंबून राहणारा संघ राहिला आहे, मग २०१९ असो किंवा २०२३ असो... छाती ५६ इंच फुगवून आयसीसीच्या स्पर्धेत दाखल व्हायचं, परंतु हळुहळू या फुग्यातील हवा गेली अन् खरं चित्र समोर येतं... भारतातही तसेच झाले अन् एका पराभवाने त्यांचे गणित बिघडले... पाकिस्तानच्या या अवस्थेसाठी खरा जबाबदार भारतीय संघच ठरला आहे...
दक्षिण आफ्रिकेचा पराभव ठरला निर्णायक...फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ २७ ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर उतरला. येथेच अफगाणिस्तानने त्यांचे पानीपत केले होते. त्यामुळे दडपण होतेच.. त्यांना केवळ २७० धावा करता आल्या आणि आफ्रिकेची फलंदाजी पाहता हे लक्ष्य काहीच नव्हते.. या स्पर्धेत आफ्रिका सहज ३५० पार धावा चोपलेल्या पाहिल्या. तरीही त्यांनी टक्कर दिली आणि एडन मार्करामच्या ( ९१) विकेटने मॅच फिरवली होती. केशव महाराज व तब्रेज शम्सी या शेवटच्या विकेटने कडवी झुंज दिली. त्या सामन्यात तब्रेझ शम्सीचा पायचीत निर्णय जर अम्पायर कॉल नसता तर पाकिस्तानने हा सामना जिंकलाच होता. तो खरा टर्निंग पॉईंट ठरला.
या पराभवानंतर पाकिस्तानचे गणित जर तरवर आले आणि बांगलादेशला त्यांनी पराभूत केले. नेदरलँड्सविरुद्ध "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या बाजूने होता आणि ४०१ धावांच्या प्रत्युत्तरात १ बाद २०० धावा केल्यानंतरही DLS नियमानुसार ते जिंकले. पण, आज न्यूझीलंडच्या विजयाने त्यांच्या आशा संपवल्या आहेत आणि समोर जे गणित आहे ते त्यांना गाठणे अवघड आहे...
पाकिस्तानचे उपांत्य फेरीसाठीचे गणित
प्रथम फलंदाजी केल्यास- ३०० धावा केल्यास इंग्लंडला १३ धावांवर गुंडाळावे लागेल- २८७ धावांनी विजय आवश्यक - ३५० धावा केल्यास इंग्लंडला ६३ धावांवर गुंडाळावे लागेल- २८७ धावांनी विजय आवश्यक - ४०० धावा केल्यास इंग्लंडला ११२ धावांवर गुंडाळावे लागेल- २८८ धावांनी विजय आवश्यक प्रथम गोलंदाजी आल्यास- इंग्लंडने ठेवलेले लक्ष्य ३ षटकांर पार करावे लागेल.