नॉटिंगहॅम : पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेत आपल्या सलामी लढतीत शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. यावेळी ते इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या चमकदार कामगिरीपासून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. पाकिस्तानने आपले अखेरचे १० एकदिवसीय सामने गमावले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-५ ने व्हाईटवॉश आणि इंग्लंडविरुद्ध ०-४ ने पत्करावा लागलेल्या पराभवांचा समावेश आहे. त्यांना या व्यतिरिक्त सराव सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ३ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
कर्णधार सरफराज अहमद म्हणाला की, त्याचा संघ २०१७ च्या कामगिरीपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यावेळीही स्थिती अशीच होती. त्यावेळी स्पर्धेपूर्वी त्यांना ऑस्ट्रेलियाने ४-१ ने पराभूत केले होते, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामी लढतीत भारताविरुद्ध १२४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने त्यानंतर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंड यांचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि भारताचा पराभव करीत जेतेपद पटकावले.
स्पॉट फिक्सिंगच्या निलंबनामुळे २०११ व २०१५ च्या विश्वकप स्पर्धेतून बाहेर राहिल्यानंतर आपला पहिला विश्वचषक स्पर्धा खेळत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आक्रमक फलंदाज ख्रिस गेल व फॉर्मात असलेल्या शाय होपचा समावेश असलेल्या विंडीजच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात यशस्वी ठरेल, अशी सरफराजला आशा आहे.
आमिरचा फॉर्म पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचा ठरेल, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यामध्ये भारताविरुद्ध तीन बळी घेत आपल्या संघाला जेतपद पटकावून देणारा आमिर त्यानंतर १५ सामन्यात केवळ ५ बळी घेऊ शकला. दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या विंडीजविरुद्ध १० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला केवळ तीनदा विजय मिळवता आला आहे. वेस्ट इंडिजने २०१५ मध्ये ख्राईस्टचर्चमध्ये त्यांचा १५० धावांनी पराभव केला होता. रसेलने त्यावेळी ४ षटकारांच्या मदतीने १३ चेंडूंमध्ये ४२ धावांची खेळी केल्यानंतर तीन बळी घेत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. रसेलने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यातही वेस्ट इंडिज संघाच्या ४२१ धावसंख्येमध्ये २५ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली होती तर होपने शतक ठोकले होते.
वेस्ट इंडिजने गेल्या वर्षी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरीच्या आधारावर विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवले आहे आणि हा संघ गेल्या काही दिवसांमध्ये फॉर्म मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. वेस्ट इंडिजने मायदेशात जागतिक क्रमवारीतील अव्वल संघ आणि विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ ने बरोबरीत सोडवली होती. दरम्यान, विंडीजला आयर्लंडमध्ये तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.