कराची, दि. 3 - पाकिस्तानचा माजी दिग्गज फलंदाज मोहम्मद यूसुफने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे. विराट कोहली हा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासारख्या महान खेळाडूंच्या पंक्तीत बसत नाही असं तो म्हणाला. सध्याच्या काळात क्रिकेटचा स्थर खालावला आहे, आमच्या काळातल्या क्रिकेटसोबत आता तुलना होऊ शकत नाही. विराट कोहली चांगला फलंदाज आहे, मला त्याचा खेळ पाहायलाही आवडतं पण सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड किंवा व्ही.व्ही.एस, लक्ष्मण यांच्या पंक्तीत तो बसतो असं मला वाटत नाही असं युसुफ म्हणाला.
जियो सुपर चॅनलसोबत बोलताना युसुफ म्हणाला, ''सचिन आणि द्रविडने तगड्या गोलंदाजांसमोर खो-याने धावा केल्या, वेगवेगळ्या खेळपट्टयांवर धावा केल्या. सध्याचे फलंदाज धावा करतात यामध्ये काही दुमत नाही पण ते दुबळ्या संघाविरोधात किंवा एकसारख्या खेळपट्ट्यांवर करतात. सध्याचे क्रिकेटचे बदललेले नियम हे फलंदाजांसाठी फायद्याचे आहेत. खेळपट्टयादेखील फलंदाजांच्या दृष्टीकोनातून बनवलेल्या असतात. आम्ही ज्या दर्जाच्या गोलंदाजांचा आणि फलंदाजांचा सामना केला त्याच्याशी तुलना करता आजच्या काळातील गोलंदाज आणि फलंदाजांकडे तो दर्जा आहे असं मला वाटत नाही. काही लोक माझ्याशी असहमत असतील पण हे माझं मत आहे. सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ बघा, त्यांच्याकडे ग्लेन मॅकग्राथ किंवा शेन वॉर्नच्या तोडीचा एकही बॉलर नाहीये. दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजकडेही तगडे बॉलर होते. भारताकडेसुद्धा अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ सारखे चांगले बॉलर होते''.
''सचिन आणि द्रविडने आग ओकणा-या गोलंदाजांसमोर खो-याने धावा केल्या, वेगवेगळ्या खेळपट्टयांवर धावा केल्या. सध्याचे फलंदाज धावा करतात यामध्ये काही दुमत नाही पण ते दुबळ्या संघांविरोधात किंवा एकसारख्या खेळपट्ट्यांवर करतात, त्यामुळे सचिन आणि द्रविड उच्चस्थराचे खेळाडू ठरतात'' असं युसुफ म्हणाला. 1998 ते 2010 मध्ये युसुफ पाकिस्तानसाठी 90 कसोटी आणि 288 एकदिवसीय सामने खेळला. दोन्ही प्रकारांमध्ये मिळून त्याने 39 शतक आणि 97 अर्धशतकं ठोकली. त्याच्या नावावर 17250 आंतरराष्ट्रीय धावा जमा आहेत.