Shoaib Akhtar on Umran Malik, India vs Pakistan: भारताचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या IPL 2022 मध्ये आपली प्रतिभा सिद्ध करत आहे. तो सातत्याने ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करत आहे. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू म्हणजेच ताशी १५७ किमी वेगाने चेंडू टाकला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा २० वर्ष जुना विक्रम मोडीत निघण्याची भीती आहे. याच संदर्भात बोलताना शोएब अख्तरने स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माझा विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत.
उमरान मलिकबद्दल शोएब अख्तर म्हणाला, “मला त्याची प्रदीर्घ कारकीर्द बघायची आहे. नुकतेच कोणीतरी माझे अभिनंदन केले की तुमच्या रेकॉर्डला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत कोणीही तो विक्रम मोडू शकलेला नाही. मग मी म्हणालो की कोणीतरी युवा गोलंदाज असावा ज्याने हा विक्रम मोडलाच पाहिजे. उमरानने जर माझा विक्रम मोडला तर मला आनंदच होईल. फक्त माझा विक्रम मोडताना त्याने स्वत:ची हाडे मोडून घेऊ नयेत. तो तंदुरुस्त राहो हीच माझी प्रार्थना आहे. त्याला दुखापतींचा सामना करायला लागू नये.”
उमरानची T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करावी का? या प्रश्नाचं उत्तर देताना अख्तर म्हणाला, “त्याला नक्कीच संघात स्थान मिळायला हवं. मला त्याना खेळताना बघायचे आहे. १५० चा टप्पा ओलांडलेले फार कमी लोक आहेत. उमरान मलिक सातत्याने १५० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. हे पाहून आनंद झाला. मला या नवीन मुलाची गोलंदाजी पाहायची होती. मला फिरकीपटू बघून कंटाळा आला आहे. पण उमरानची वेगवान गोलंदाजी पाहून खूप आनंद होतो”, असं शोएब अख्तरने स्पष्ट केलं.