पाकिस्तानी स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना मोठा धक्का बसला आहे. अलीकडच्या काळात या दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळानं सर्वांना प्रभावित केलं आहे. असं असूनही त्याला इंग्लंडच्या प्रतिष्ठित लीग 'द हंड्रेड'मध्ये त्यांना कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. इतकंच नाही तर वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड आणि किवीचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या दिग्गजांनाही यावेळी ड्राफ्टमध्ये स्थान मिळवता आलं नाही.
जिथे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना यावेळी कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. तर शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी आपली जागा वाचवण्यात यश मिळवले आहे. आफ्रिदीला वेल्श फायरनं एक लाख पौंड म्हणजेच सुमारे एक कोटी रुपयांसह आपल्या संघात सामील केलंय.
२३ मार्च (गुरुवार) रोजी 'द हंड्रेड'साठी खेळाडूंचा मसुदा तयार करण्यात आला. यासह आठही संघांनी आगामी हंगामासाठी आपापल्या टीम्स पूर्ण केल्या आहेत. 'द हंड्रेड'चा तिसरा सीझन अॅशेसनंतर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सर्व संघांमध्ये सध्या १४-१४ खेळाडू आहेत. संघ वाइल्ड कार्डद्वारे आणखी दोन देशांतर्गत खेळाडूंना जोडू शकतात.