Shahid Afridi On Pakistan T20 Captaincy: वन डे विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानी संघात अनेक बदल करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या संचालकपदी माजी खेळाडू मोहम्मद हफिजला संधी दिली. बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शान मसूदची कसोटी संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागली. तर, शाहीन आफ्रिदीकडे ट्वेंटी-२० संघाची धुरा सोपवण्यात आली. पाकिस्तानी संघाचा खेळाडू वहाब रियाज मुख्य निवडकर्ता म्हणून कार्यरत असून त्यानेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड केली. पण, शेजाऱ्यांनी आपला लाजिरवाणा विक्रम कायम ठेवत पुन्हा एकदा कांगारूंच्या धरतीवर निराशाजनक कामगिरी केली. अशातच शाहीन आफ्रिदीकडे संघाची धुरा सोपवल्यामुळे माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने २-० ने विजयी आघाडी घेतली. या मालिकेनंतर पाकिस्तानी संघ न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे, ज्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तान किवी संघाशी भिडेल.
रिझवान कर्णधार असायला हवा होता - आफ्रिदी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदीने म्हटले, "मी मोहम्मद रिझवानची मेहनत आणि त्याच्या खेळीचा चाहता आहे. तो त्याच्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रीत करतो ही त्याची सवय मला भुरळ घालते. कोण काय करतो याने त्याला काहीच फरक पडत नाही. तो क्रिकेटमधील एक योद्धा आहे. त्यामुळे मी बाबर आझमनंतर ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवानकडे पाहत होतो. पण, चुकून शाहीन आफ्रिदीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे." शाहीन आफ्रिदी हा शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. दरम्यान, पाकिस्तानी संघ १२ जानेवारीपासून न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यासाठी शेजाऱ्यांच्या संघाची घोषणा झाली आहे.
पाकिस्तानी संघ -शाहीन आफ्रिदी (कर्णधार), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान, अबरार अहमद, बाबर आझम, फखर झमान, हारिस रौफ, हसिबुल्लाह खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसिम, सहिबझादा फर्हान, सैय अयुब, उसामा मीर, झमान खान.