T20 World Cup Semi Final, Australia beat Pakistan : पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत अडवला. ग्रुप २ मधील पाचही सामने जिंकून उपांत्य फेरीत धडकणाऱ्या पाकिस्तानला आता कुणीच अडवू शकत नाही, असा दावा त्यांच्या माजी खेळाडूंनी केला. पण, ऑस्ट्रेलियानं त्यांची हवा काढली. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियानं ५ विकेट्स व १ षटक हातचे राखून पार केले. डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस व मॅथ्यू वेड यांनी दमदार खेळ केला. हसन अलीकडून सुटलेला झेल सामन्यातला टर्निंग पॉईंट ठरला. पाकिस्तानच्या कामगिरीवर त्यांच्या चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात पाकिस्तानी खेळाडू मायदेशात न जाता ढाका येथे पोहोचले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) ही माहिती दिली आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी शनिवारी ढाका येथे दाखल झाले. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली हा संघ येथे तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी २६ नोव्हेंबरपासून चत्तोग्राम येथे, तर दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून ढाका येथे खेळवली जाणार आहे. पण, संघासोबत कर्णधार बाबर व अनुभवी खेळाडू शोएब मलिक आलेला नाही. ते १६ नोव्हेंबरला ढाका येथे दाखल होतील, असे पीसीबीनं स्पष्ट केलं. बांगलादेश दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील खेळाडूच कायम ठेवले गेले आहेत, अनुभवी खेळाडू मोहम्मद हाफिज यानं PCBकडे विश्रांती मागितली असल्यानं तो मायदेशात गेला आहे.
सेमी फायनलच्या लढतीत काय झालं?बाबर आजम- मोहम्मद रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पण, डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावा चोपल्या. मॅथ्यू वेड व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला.
Web Title: Pakistan team Arrives in Dhaka for three T20I and two Test match series against Bangladesh which begins on 19 November
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.