नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानच्या धरतीवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. रावळपिंडी कसोटीत सामन्याच्या पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रात पाकिस्तानला विजयासाठी फक्त 86 धावांची गरज होती आणि त्यांचे 5 बळी शिल्लक होते. खरं तर सामन्यात पाकिस्तानी संघाची पकड मजबूत होती मात्र अखेरच्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांनी यजमानांचा धुव्वा उडवला. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 4-4 बळी पटकावून रावळपिंडी मैदानावर स्मशात शांतता प्रस्थापित केली.
पाकिस्तान संघाला इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यानंतर कर्णधार बाबर आझमने पराभवाच्या कारणांच्या यादीत खेळपट्टीचा देखील उल्लेख केला होता. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे 9 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. रावळपिंडीत निर्माण झालेला पेच कमी करण्यासाठी पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांनी मुलतानकडे धाव घेतली आहे.
मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाकिस्तानच्या हालचाली
कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवसापासून रावळपिंडीची खेळपट्टी चर्चेत आली होती. खेळपट्टीवर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर इंग्लिश संघाने पाकिस्तानला त्यांच्या घरात पराभवाची धूळ चारली. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांनी दुसऱ्या सामन्याच्या 3 दिवस आधीच मुलतान गाठले आणि खेळपट्टीच्या क्युरेटरची भेट घेतली. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी तयार करण्यासाठी ते पुढील काही दिवस मुलतानमध्ये राहणार आहेत. मुलतानची खेळपट्टी अशी असावी की त्यामुळे त्यांना खूप मदत होईल आणि इंग्लंडविरुद्धची मालिका बरोबरी साधता येईल, असा पाकिस्तानचा हेतू आहे.
बाबरने पराभवानंतर म्हटले...
पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने पराभवानंतर म्हटले होते, खेळपट्टी तयार करण्यासाठी माझे मत घेण्यात आले होते. आम्हाला कोणत्या प्रकारची खेळपट्टी हवी आहे हे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते, परंतु हवामान आणि इतर काही कोणत्याही कारणांमुळे आम्हाला हवी ती खेळपट्टी मिळाली नाही. आम्हाला फिरकीपटूंना थोडी मदत करणारी खेळपट्टी हवी होती, पण तसे झाले नाही. रावळपिंडी कसोटी सामन्यात 5 दिवसात 1768 धावा झाल्या, तर 37 बळी पडले. यादरम्यान 7 फलंदाजांनी शतके झळकावली. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांनी दोन्ही डावात शानदार गोलंदाजी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Pakistan team coach Mohammad Yousuf has gone to Multan to prepare the pitch for the second match of the test series of PAK vs ENG
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.