पाकिस्तानी क्रिकेट संघाला पुढील महिन्यात भारतात होत असलेल्या ब्लाईंड वर्ल्डकप स्पर्धेसाठी अद्यापही व्हीजा मिळालेला नाही. त्यामुळे, आयोजकही त्रस्त झाले आहेत. भारतीय ब्लाइंड क्रिकेट संघ (सीएबीआय) 5 ते 17 डिसेंबरपर्यंत तिसऱ्या ब्लाइंड टी-20 विश्व कप स्पर्धेचं आयोजन करत आहे. या टूर्नामेंटमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंका टीमचा सहभाग असणार आहे.
जागतिक ब्लाइंड विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या देशातील संघाना ४ डिसेंबरपर्यंत भारतात येणे बंधनकारक आहे. मात्र, पाकिस्तानी संघाला अद्यापही भारतीय परराष्ट्रमंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडून परवानगी व व्हीजा मिळाला नाही. आयोजकांनी यापूर्वीच गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे या परवानग्या आणि व्हिजासाठीची कागदोपत्री प्रक्रिया केली आहे. तर, पाकिस्तानकडून व्हीजा मिळवण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत. आता, या सामन्यांसाठी जास्त वेळ शिल्लक राहिला नाही. त्यामुळेच, पाकिस्तानी संघ आणि आयोजकांना व्हीजा मिळवण्यासाठीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जर पाकिस्तानी संघाला व्हीजा मिळालाच नाही, तर स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाचं काय होईल, असा प्रश्न आयोजकांना सतावत आहे. भारताने २०१२ आणि २०१७ साली ब्लाइंड टी-20 विश्वकप जिंकून आपलं नाव कोरलं आहे. यंदा तिसऱ्यांदा हा कप जिंकत हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानी संघाचा पराभव केला. दरम्यान, २०१२ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय सिरीज बंद असून केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतच हे दोन्ही कट्टर विरोधी संघ मैदानात भिडताना दिसून येतात.