ind vs pak world cup 2023 | नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच आयसीसीने भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खरं तर वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात वादंग सुरू असल्याचे दिसते. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी येणार नाही अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानने मवाळ भूमिका घेत आयसीसीच्या निर्णयाचे स्वागत केले. पण आता आशिया चषकावरून पुन्हा एकदा पाकिस्तानने धमकी देण्यास सुरूवात केली आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी आला नाही अथवा तटस्ठ ठिकाणी खेळणार असेल तर आम्ही देखील विश्वचषकासाठी तसा विचार करू, असे पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी म्हटले आहे.
भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या सहभागाबाबत निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. समिती शरीफ यांना शिफारशी सोपवण्याआधी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील सर्व पैलू खेळ आणि राजकारण यांना वेगळे ठेवण्याची सरकारची नीती, खेळाडू, अधिकारी, चाहते आणि माध्यमे या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध असल्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ पाकिस्तान सरकारच्या मंजुरीवरच अवलंबून असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याआधीच स्पष्ट केले आहे. समितीतील अन्य सदस्यांमध्ये क्रीडामंत्री अहसान मजारी, मरियम औरंगजेब, असद महमूद, अमीन उल हक, कमर जमान कैरा आणि तारिक फातमी यांचा समावेश आहे.
पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्याचा BCCI ला इशाराइंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी म्हटले, "जर भारताने त्यांचे आशिया चषक स्पर्धेतील सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली, तर आम्ही देखील भारतातील आमच्या विश्वचषक सामन्यांसाठीही तशी मागणी करू."
१५ ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगते.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू