दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 क्रमवारीत भारतीय संघाची तीन स्थानांची घसरण झाली आहे. आयसीसीने प्रथमच 80 संघांचा समावेश असलेली क्रमवारी जाहीर केली. त्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. सुधारीत क्रमवारी जाहीर करण्यापूर्वी भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर होता. पाकिस्तानने या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
2009साली ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या खात्यात 286 गुण आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका (262), इंग्लंड ( 261), ऑस्ट्रेलिया ( 261) आणि भारत ( 260) यांचा क्रमांक येतो. या क्रमवारीत अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी अनुक्रमे 7 आणि 8 वे स्थान पटकावले आहे, तर वेस्ट इंडिज 9व्या स्थानावर आहे. नेपाळ आणि नामिबिया हे दोन नवीन संघ या क्रमवारीत दाखल झालेआहेत. त्यांनी अनुक्रमे 11 वे व 20वे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रीया, बोत्सववाना, लक्सेमबर्ग आणि मोझाम्बीक्यू ही काही नवीन नावं क्रमवारीत दिसत आहेत.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये संघसंख्या वाढवण्याचा निर्णय गतवर्षी आयसीसीने घेतला होता. 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसीने पात्रता स्पर्धेतही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार पाच विभागात 58 सामने खेळवण्यात येणार आहेत. पापुआ न्यू गिनी येथे पहिल्या विभागाची अंतिम लढत नुकतीच झाली. उर्वरित चार फायनल्स या आफ्रिका-यूगांडा ( 19 ते 24 मे), युरोप-जर्नसी ( 15 ते 19 जून), आशिया- सिंगापूर ( 22 ते 28 जुलै) आणि अमेरिका ( 19 ते 25 ऑगस्ट) अशा होतील. या स्पर्धेतील विजेता संघ उर्वरित संघांसोबत पात्रता स्पर्धेत खेळेल.