लाहोर: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. मात्र, मार्चअखेर होणाऱ्या या मालिकेवर पाकिस्तानच्या राजकीय गोंधळाचा परिणाम झाल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान (Imran Khan) खान यांच्या विरोधात देशातील राजकीय वातावरण तापलं असून अशा परिस्थितीत पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये म्हणून मालिकेचे ठिकाण (Pak vs Aus ODI Series venue changed) बदलण्यात आले आहे.
२९ मार्चपासून सुरू होणारी ही मालिका आता रावळपिंडी ऐवजी लाहोरमध्ये खेळली जाणार आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असून त्यावर पुढील आठवड्यात मतदान होणार आहे. इम्रान खान यांचा सत्ताधारी पक्ष पीटीआय २७ मार्च रोजी इस्लामाबादमध्ये एक मोठी रॅली काढणार आहे, ज्यामध्ये लाखो समर्थक पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर २३ मार्च रोजी विरोधी पक्षांचा मोर्चा रावळपिंडी ते इस्लामाबाद असा निघणार आहे. या साऱ्या राजकीय वातवरणाचा परिणाम क्रिकेटवर होऊ नये म्हणून ठिकाण बदलल्याचं सांगण्यात येत आहे.
ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी शुक्रवारी १८ मार्च रोजी याची घोषणा केली. जरी ही रॅली इस्लामाबादमध्ये होणार असली तरी, रावळपिंडी हे इस्लामाबादला लागून असलेले शहर असल्याने सुरक्षेचा धोका आहे. इस्लामाबादमध्ये २७ मार्चला इम्रान समर्थकांची रॅली ज्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाण रावळपिंडीतील दोन्ही संघांच्या हॉटेलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून असा निर्णय घेतला गेला आहे.