ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने कसोटी क्रिकेटमधील आपल्या खेळाचा दर्जा टिकवून ठेवत नवा विक्रम रचला. पाकिस्तानच्या संघाला पहिल्या डावात स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव तीन बाद २२७ वर घोषित केला. उस्मान ख्वाजाने दमदार शतक (१०४) तर डेव्हिड वॉर्नरने शानदार अर्धशतक (५१) ठोकलं. स्टीव्ह स्मिथने अवघ्या १७ धावांची खेळी केली, पण त्यातही त्याने एक धमाकेदार विक्रमाला गवसणी घातली. अप्रतिम फलंदाजी करत त्याने सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कुमार संगाकारा या साऱ्यांना मागे टाकलं.
स्मिथने गुरूवारी पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सात धावा काढत ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला. ८,००० कसोटी धावा सर्वात जलदगतीने करण्याचा नवा विक्रम त्याने आपल्या नावे केला. स्मिथने आपल्या १५१व्या डावात ही कामगिरी केली. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने १५२ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. तर २००२ साली १५४व्या डावात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा टप्पा ओलांडला होता. वेस्ट इंडीजचे गॅरी सोबर्स या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी १५७ डावांमध्ये हा विक्रम केला होता. तर 'द वॉल' राहुल द्रविडने १५८ डावांत ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
स्टीव्ह स्मिथने २०१० साली लॉर्ड्स येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत, स्मिथने सुमारे ६० च्या सरासरीने ८ हजारांहून अधिक धावा केल्या. स्मिथने कसोटीमध्ये २७ शतके आणि ३६ अर्धशतके ठोकली आहेत.
दरम्यान, सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव घोषित करून पाकिस्तानला ३५१ धावांचे अंतिम लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानने बिनबाद ७३ धावांपर्यंत मजल मारली. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. त्यामुळे या कसोटीचा तरी निकाल लागणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.