पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रावळपिंडी येथील मैदानात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. फलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्यानंतर पाकिस्तानच्या नव्या गोलंदाजाने आपली जादू दाखवली. खुर्रम शहजाद (Khurram Shahzad) याने अप्रतिम चेंडू टाकत महत्त्वाच्या दोन विकेट्स घेत बांगलादेशच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. आपला दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या शहजादनं अचूक टप्पा आणि गोलंदाजीतील स्विंग दाखवून देत पाकिस्तानला गोलंदाजीत आणखी एक हिरो मिळाल्याचे संकेतच दिले आहेत.
खुर्रम शहजादची लक्षवेधी गोलंदाजी
रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेत पाहुण्या बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. फलंदाजीत मोहम्मद रिझवान 171 (239)आणि सौद शकील 141(261) यांच्या हिट शोनंतर गोलंदाजीवेळी पाकच्या ताफ्यातील खुर्रम शहजाद (Khurram Shahzad) याने लक्षवेधी गोलंदाजी केली.
सापळा रचून फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
खुर्रम शहजादनं बांगलादेशच्या डावखुऱ्या फलंदाजांना अगदी सापळा रचून आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पाहायला मिळाले. नजमुल हुसेन शांतोच्या रुपात शहजाद याने घरच्या मैदानात आपली पहिली कसोटी विकेट घेतली. बांगलादेशच्या कर्णधाराने ४२ चेंडूंचा सामना करत फक्त १६ धावा केल्या. संघाच्या धावफलकावर ५३ धावा असताना बांगलादेशनं ही दुसरी विकेट गमावली होती.
जशी पहिली विकेट घेतली अगदी तशीच दुसरी विकेटही मिळवली
मोमीनुल हुक याने (Mominul Haque) अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. सलामीवीर शदमन इस्लाम (Shadman Islam) च्या साथीनं त्याने ९४ धावांची भागीदारी केली. ही जोडी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत असताना पाकच्या कर्णधारानं पुन्हा चेंडू खुर्रम शहजादच्या हाती सोपवला. या गोलंदाजाने आपल्या कर्णधाराच विश्वास सार्थ ठरवत सेट झालेल्या मोमीनुल हुकला तंबूत धाडले. अगदी परफेक्ट प्लानिंग करून त्याने डावखुऱ्या फलंदाजांना तंबूत धाडले. दोन्ही विकेट्समधील खासियत ही की, कॉपी पेस्ट फॉर्म्युल्यासह एखादी गोष्ट जशीच्या तशी करावी, अगदी तोच सीन त्याच्या या दोन विकेट्समध्ये दिसून येतो. डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी कमालीचा इनस्विंग टाकण्याआधी त्यांने बाहेर जाणाऱ्या चेंडूसह फलंदाजांना भुलवण्याचे काम केले. जो चेंडू त्याने आत आणला तो फलंदाजाला कळण्याआधी त्याचा त्रिफळा उडलेला होता.