Join us  

पाकनं धावांचा डोंगर उभारला; पण बांगलादेशनं तो डोंगर पोखरून दाखवला!

जे पाकिस्तानी संघाच्या डोक्यात होतं ते सपशेल चुकीच ठरलं. कारण बांगलादेशनं या सामन्यात आघाडी घेतली. धावांचा डोंगर त्यांनी पोखरून दाखवलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 4:12 PM

Open in App

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकिस्तानचा संघ पहिल्या डावानंतर हवेत होता. कारण दोन शतकवीरांच्या जोरावर धावांचा डोंगर उभारल्याचा ते अविर्भावात होते. खूप धावा केल्यात हे फिल नसतं तर कॅप्टन शान मसूदनं मोहम्मद रिझवान द्विशतकाच्या उंबरठ्यावर असताना डाव घोषित केला नसता. पाहुण्या बांगलादेशला ४४८ धावा या डोंगरासारख्या आहेत, हे जे पाकिस्तानी संघाच्या डोक्यात होतं ते सपशेल चुकीच ठरलं. कारण बांगलादेशनं या सामन्यात आघाडी घेतली. धावांचा डोंगर त्यांनी पोखरून दाखवलाय. त्यामुळे बांगलादेशच्या बॅटिंग कमी लेखून पाकिस्तानचा चांगलाच पोपट झाल्याचे दिसते.  

रावळपिंडी टेस्टमध्ये बेस्ट सेंट्युरी, मुशफिकुरनं रचला इतिहास

बांगलादेशच्या संघाकडून मोहम्मद मुशफिकुर रहिम याने सर्वोच्च खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. रावळपिंडी कसोटी सामन्यात मुशफिकुर रहिम याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११ व्या शतकाला गवसणी घातली. या शतकासह मुशफिकुर हा बांगलादेशकडून परदेशात सर्वाधिक ५ शतके झळकवणारा फलंदाज ठरला आहे. त्याने तमीम इक्बालचा ४ शतकांचा विक्रम मागे टाकला.

 बांगलादेशचे फलंदाज ठरले भारी; पाक गोलंदाजांचे पाडले खांदे  

रावळपिंडीच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत बांगलादेश संघाने धावफलकावर ६ बाद ४९५ धावा लावल्या होत्या. मुशफिकुर रहिम १७३ (३१४)* मोठी खेळी करून सेट झाला होता. दुसरीकडे मेहंदी हसन मीराझ ५० (१२४)* याने अर्धशतक पूर्ण केले होते.  त्याआधी सलामीवीर शदमन इस्लाम ९३ (१८३), मोमीनल हक ५० (७६) आणि लिटन दास ५६ (७८) यांनी अर्धशतकी खेळीसह संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.

सामना अनिर्णित राहण्याचे संकेत

रावळपिंडीतील घरच्या मैदानाचा फायदा उठवत पाकिस्तानच्या संघाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी होती. पण बांगलादेशच्या फलंदाजांनी त्यांचे मनसुबे उधळण्याचे संकेत देणारी खेळी केली आहे. पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावात ४४८ धावा केल्यानंतर बांगलादेशच्या संघाने ५०० + चा आकडा गाठून हा सामना निकाली लागण्याचे संकेत धुसर झाले आहेत. हा सामना अनिर्णित राहण्याच्या दिशेनं पुढे सरकत आहे. याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने दोन्ही संघावर विपरित परिणाम होईल.   

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेश