बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा बब्बर शेर बाबर आझम अपयशी ठरला. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात तो पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात अवघ्या २२ धावांवर बाद झाला होता. रावळपिंडीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली. पण ७१ चेंडूंचा सामना करून तो ३१ धावांवरच माघारी फिरला. मागील १५ डावात त्याच्या भात्यातून ५० पेक्षा अधिक धावा आल्याचे पाहायला मिळालेले नाही.
४००० धावांचा टप्पा आणखी लांबणीवर
बाबर आझमला बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या खेळीसह ४ हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त ८० धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी त्याच्या खात्यात ५३ कसोटी सामन्यात ३९२० धावा जमा होत्या. यात आता फक्त ३१ धावांची भर पडली असून अजूनही त्याला हा पल्ला गाठण्यासाठी ४९ धावांची आवश्यकता आहे. त्याचा फॉर्म बघता हा टप्पा तो या मालिकेत पूर्ण करेल, असे वाटत नाही.
६६४ दिवसांआधी आली होती सेंच्युरी
बाबर आझमच्या भात्यातून अखेरचे कसोटी शतक हे २०२२ मध्ये आले होते. कराची कसोटी सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध त्याने २६ डिसेंबर २०२२ रोजी १६१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळालेले नाही. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो संघर्ष करताना दिसत आहे.
मागील १५ डावातील आकडेवारी थक्क करून सोडणारी
या शतकानंतर तो अर्धशतकी आकडाही गाठू शकलेला नाही. बाबर आझमने मागील १५ डावात ज्या धावा केल्या आहेत तो आकडा थक्क करून सोडणारा आहे. ३१, २२, ०,२३, २६, ४१, १, १४, २१, ३९, २४, १४, २४, २७ आणि १३ अशा धावा काढल्या आहेत. त्याच्या या आकडेवारीमुळेच पाकिस्तान संघाचेही टेन्शन वाढवले आहे.