इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुल्तानच्या मैदानात सुरु आहे. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या ताफ्यातील दोघांनी शतकी खेळीसह दिवस गाजवला. जो रुटसह (Joe Root) हॅरी ब्रूक्सच्या (Harry Brook) भात्यातून शानदार शतक पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवसाअखेर ही जोडी नाबाद पॅव्हिलियनमध्ये परतली. एका बाजूला जो रुटनं आपल्या शतकी खेळीसह अनेक विक्रम नोंदवले. दुसरीकडे ब्रूक्सचं शतकही एकदम खास विक्रम सेट करणारे ठरलं.
हॅरी ब्रूकचं सलग चौथं पाकच्या मैदानात सलग चौथ शतक
पाकिस्तान विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात खेळताना हॅरी ब्रूक्सच्या खात्यातून निघालेले हे चौथे शतक ठरले. पाकिस्तानचे माजी दिग्गज अष्टपैलू इम्रान खान यांना जे जमलं नाही ते हॅरी ब्रूकनं पाकिस्तानच्या मैदानात करून दाखवलं आहे. इम्रान खान यांच्या खात्यात पाकिस्तानमध्ये कसोटीत ३ शतकांची नोंद आहे. हॅरी ब्रूक पाकिस्तानच्या मैदानात सलग ४ शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. हॅरी ब्रूकचा पाकमध्ये शतकांचा सिलसिला
हॅरी ब्रूकनं डिसेंबर २०२२ मध्ये रावळपिंडी कसोटीतून शतकी खेळीचा सिलसिला सुरु केला होता. या पहिल्या सामन्यात त्याने १५३ धावांची खेळी केली होती. याच दौऱ्यातील मुल्तान कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने १०८ धावांची खेळी केली होती. हा सिलसिला कराची स्टेडियमवरही कायम राहिला. जिथं त्याने १११ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. आता २०२४ च्या दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात ब्रूकनं आपला पाकिस्तानी मैदानातील धडाका कायम ठेवत शतकी चौका मारला आहे.
पाकिस्तान विरुद्ध सलग सर्वाधिक शतके झळकवणारे खेळाडू
- ४ - ब्रायन लारा (२००७-१०)
- ४ - जॅक कॅलिस (२००५-०६)
- ४ - डेविड वॉर्नर (२०१६-१९)
- ४ - केन विलियम्सन (२०१८-२२)
इम्रान खान यांचा पाकिस्तानमधील शतकी कामगिरीचा रेकॉर्ड
इम्रान खान यांनी नोव्हेंबर १९८० मध्ये पाकिस्तानकडून पहिलं कसोटी शतक झळकावले होते. लाहोरच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी पहिल्या डावात १२३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर जानेवारी १९८३ मध्ये फैसलाबाद कसोटीत त्यांच्या भात्यातून ११७ धावांची खेळी आली होती. पाकिस्तानच्या या दिग्गजाचे घरच्या मैदानातील अखेरचं कसोटी शतक १९८९ मध्ये टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात आले होते. कराचीच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी १०९ धावांची खेळी केली होती.