नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. आज या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली. पहिला सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना मुलतान येथे खेळवला जात आहे. या सामन्यातून पाकिस्तानचा युवा खेळाडू अबरार अहमदने पदार्पण केले आणि अविस्मरणीय खेळी केली.
आपल्या पहिल्याच सामन्यात अबरारने इंग्लिश फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. अबरारने इंग्लंडच्या सुरूवातीच्या 7 फलंदाजांची शिकार केली. यासह अबरार पदार्पणाच्या कसोटी डावात सर्वाधिक 7 बळी घेणारा पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी मोहम्मद जाहिद आणि मोहम्मद नाझिरने असा कारनामा केला होता.
अबरराच्या भावाने सांगितला किस्सामुलतानच्या मैदानावर इतिहास रचणाऱ्या अबरारचे या मैदानाशी जुने नाते आहे. ज्याचा खुलासा त्याच्या भावाने केला आहे. त्याने सांगितले की 2004 च्या पाकिस्तान दौऱ्यावर भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने याच मैदानावर त्रिशतक झळकावले होते. त्यावेळी अबरार केवळ 6 वर्षांचा होता. तेव्हा सेहवागने पाकिस्तानी दिग्गज सकलैन मुश्ताकच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करून षटकारांचा पाऊस पडला होता. तेव्हा 6 वर्षांचा अबरार खूप भावुक झाला होता आणि रडत होता. अबरारच्या भावाने सांगितले की तेव्हा अबरार लहान होता त्यामुळे सकलैनच्या गोलंदाजीला दोष द्यायचा.
"अबरारला वडिलांनी खोलीत कोंडून ठेवले होते"अबरारचा भाऊ साजिदने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले, "आजही मला आठवते की तो मुलतानचा कसोटी सामना होता. जिथे वीरेंद्र सेहवागने त्रिशतक झळकावले होते. तेव्हा त्याने सकलैन मुश्ताकविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. तेव्हा अबरार सहा वर्षांचा होता. तेव्हा तो सकलैन मुश्ताक यांच्या चुकांबद्दल बोलायचा, अकबारच्या कॉमेंट्रीला वडील वैतागले होते. म्हणून त्यांनी अबरारला दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले." हे सांगताना साजिदला देखील हसू आवरले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"