Test Record Of 20 Wickets Taken By 2 Bowlers Noman Ali And Sajid Khan Created History : पाकिस्तानच्या संघानं तब्बल १३३८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर घरच्या मैदानात कसोटी सामना जिंकला. मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातील विजयासह पाकिस्तानच्या संघाने इंग्लंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंडच्या संघाने शानदार विजयाने सुरुवात केली होती. पण बेन स्टोक्सच्या कॅमबॅक टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला पराभवाचा दणका बसला.
पाकिस्तान-इंग्लंड कसोटी सामन्यात खास विक्रम
इंग्लंडच्या संघानं दुसरा कसोटी सामना १५२ धावांनी गमावला. या कसोटी सामन्यातील सर्वात लक्षवेधी गोष्ट ही की, पाकिस्तानच्या ताफ्यातील फक्त दोन गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था पळताभुई थोडी करून ठेवली. यासह कसोटीच्या इतिहासात एक खास विक्रमही नोंदवला गेला आहे.
दोघांनी मिळून घेतल्या २० विकेट्स
मुल्तानच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या ताफ्यातील दोन गोलंदाजांनी मिळून इंग्लंड संघाच्या एकूण २० विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५२ वर्षांनी असा कमालीचा योगायोग पाहायला मिळाला. पाकिस्तानकडून साजिद खान याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ७ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे नोमानला या डावात ३ विकेट्स मिळाल्या. दुसऱ्या डावात नौमान अलीनं इंग्लडच्या ८ गड्यांना तंबूत धाडले. तर यावेळी साजिद खानला २ विकेट्स मिळाल्या. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या पहिल्या विजयात या दोन गोलंदाजांनी खास कामगिरीसह इतिहास रचला.
याआधी कोणत्या गोलंदाजांनी केलाय असा पराक्रम
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन गोलंदाजांनी २० विकेट्स घेण्याची तशी ही पहिली वेळ नाही. याआधी तब्बल ६ वेळा टेस्ट मॅचमध्ये दोन गोलंदाजांनी मिळून २० विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
- १९०२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा दोन गोलंदाजांनी अशी कमाल केली होती. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील नोबल आणि ट्रंबले या जोडीनं ही कमालीची कामगिरी करून दाखवली होती.
- १९९० मध्ये इंग्लंडच्या ब्लिथ आणि हर्स्ट या दोन गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी कामगिरी केली होती.
- १९१० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील व्लॉगर आणि फॉकनर यांनी मिळून इंग्लंडच्या संघाच्या २० विकेट्स घेतल्या होत्या.
- १९५६ मध्ये इंग्लंडच्या जिम लेकर आणि टी लॉक यांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या २० विकेट्स पटकावल्या होत्या.
- १९५६ मध्ये पाकिस्तानच्या महमूद आणि खान मोहम्मद या दोन गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २० विकेट्स घेण्याचा पराक्रम नोंदवला होता.
- १९७२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या के बी मॅसी आणि डेनिस लिली यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात २० विकेट्स घेतल्या होत्या.