Irfan Pathan, India vs Pakistan: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि पाकिस्तानी पत्रकार यांच्यात ट्विटरवर वाद पाहायला मिळाला. इरफानने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचं ट्विट करून कौतुक केले होते. ही गोष्ट पाकिस्तानी पत्रकार इहतिशाम उल हक याला रूचली नाही. शमीने यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ४ षटकात २५ धावा देऊन ३ बळी घेतले. शमीने पॉवरप्लेमध्ये लखनौच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यावरूनच इरफान आणि पाकिस्तानी पत्रकारात खडाजंगी झाल्याचं दिसून आलं.
शमीच्या चांगल्या कामगिरीनंतर इरफान पठाणने त्याची स्तुती करताना लिहिले होते की, सध्या जागतिक क्रिकेटमध्ये असा एकही गोलंदाज नाही, जो नवीन चेंडूचा मोहम्मद शमीपेक्षा चांगला वापर करू शकेल.' यावर इहतिशमने टोमणा मारला की, '(शमीची गोलंदाजी चांगली आहे म्हणण्यापेक्षा) त्या फलंदाजांना शमीला खेळता येत नाही. शमी चांगली गोलंदाजी करत नाही. फलंदाज कमकुवत आहेत, जे त्याची गोलंदाजी खेळू शकत नाहीत.
पाकिस्तानी पत्रकाराला प्रत्युत्तर देताना इरफान पठाणने पाकिस्तानी पत्रकाराला 'स्वस्तातला क्रिकेट एक्स्पर्ट' म्हणाला. तसेच, इरफान म्हणाला की, २००३च्या विश्वचषकात वसीम अक्रम (महान गोलंदाज) हा सचिन तेंडुलकरच्या प्रतिभेला (महान फलंदाज) टक्कर देऊ शकला नाही. याचा अर्थ असा होतो का, की अक्रमला गोलंदाजी करता आली नाही??
दरम्यान, गुजरात टायटन्स हा नवा संघ आहे. संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. मेगा लिलावात मोहम्मद शमीला गुजरात संघाने ६.२५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. शमीने आतापर्यंत IPLमध्ये एकूण ७८ सामने खेळले असून ८.६ च्या इकॉनॉमी रेटने ८२ बळी घेतले आहेत.