Pakistan vs Sri Lanka Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातला सामना हा उपांत्य फेरीसारखाच आहे. जो संघ जिंकेल, तो फायनल खेळेल. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आज चांगली सुरुवात करताना पाकिस्तानचा निम्मा संघ १३० धावांत तंबूत पाठवला होता. मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी १०८ धावांची भागीदारी केली अन् चित्र बदलले. पाकिस्तानने ४२ षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या आहेत आणि श्रीलंकेला विजयासाठी २५२ धावाच कराव्या लागणार आहेत.
फखर जमान ( ४) अपयशी ठरल्यानंतर बाबर आजम ( २९)ने अब्दुल्लाह शफिकसह ६४ धावांची भागीदारी केली. शफिकने ५२ धावांची खेळी करून त्याची निवड योग्य ठरवली. पण, दुसऱ्या बाजूने विकेट्स पडल्या अन् ५ बाद १३० अशी पाकिस्तानची अवस्था झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे ४५-४५ षटकांचा हा सामना ४२-४२ षटकांचा खेळवण्याचे ठरले. मोहम्मद रिझवानला दिलेलं जीवदान महागात पडले. रिझवान ७३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ८६ धावांवर नाबाद राहिला. इफ्तिखार ४० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला. पाकिस्तानने ४२ षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या. मथिषा पथिराणाने ३ अन् प्रमोद मदुशाने २ विकेट्स घेतल्या.
जाणून घेऊया गणित... पाकिस्तानने शेवटच्या १० षटकांत १०२ धावा चोपल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे येथे DLS अर्थात डकवर्थ लुईस नियम लागू झाला अन् त्यानुसार श्रीलंकेसमोर ४२ षटकांत २५२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.