Pakistan vs Sri Lanka Live Marathi : भारतीय फलंदाजांना संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या २० वर्षीय फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने ( Dunith Wellalege) आज पाकिस्तानचीही गोची केली. पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील करो वा मरो सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फखर जमान पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि अब्दुल्लाह शफिक यांनी ६४ धावांची भागीदारी करून पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण, वेल्लालागेने अप्रतिम चेंडूवर नंबर १ फलंदाज बाबर आजमचा काटा काढला. वेल्लालागेचा चेंडू बाबरला समजलाच नाही अन् त्याचा पाय क्रिजपासून दूर केला. तो परत येईपर्यंत यष्टिरक्षकाने चपळाईने बेल्स उडवल्या.
श्रीलंकेचा गोलंदाज पडला, पण अचूक चेंडू टाकून पाकिस्तानी फलंदाजाचा दांडा उडवला, Video
पावसामुळे हा सामना सव्वा दोन तास उशीराने सुरू करण्यात आल्याने ४५-४५ षटकांची मॅच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. या सामन्यातील विजेता संघ १७ सप्टेंबरला भारताविरुद्ध फायनल खेळेल. फखर जमान पुन्हा अपयशी ठरला अन् प्रमोद मदुशानने तिसऱ्या षटकात फखरचा ( ४) त्रिफळा उडवला. बाबर आजमने चौकाराने खाते उघडले, परंतु भारताविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या दुनिथ वेल्लालागेच्या फिरकीवर तो थोडक्यात वाचला. चेंडू स्टम्पच्या अगदी जवळून गेला होता. अब्दुल्लाह शफिक आणि बाबर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला सावरले.
पण, वेल्लालागेने पाकिस्तानी कर्णधाराचा पाठलाग नाही सोडला. त्याच्या अप्रतिम चेंडूवर बचावात्मक खेळ करायला गेलेल्या बाबरला यष्टिरक्षक कुसल मेंडिसने चपळाईने स्टम्पिंग केले. बाबर ३५ चेंडूंत २९ धावांवर यष्टीचीत होऊन परतला. पाकिस्तानला ७३ धावांवर दुसरा धक्का बसला. कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये ४ वेळा स्टम्पिंग होणारा तो पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी, मार्क वॉ ( १९९२), शेन थॉम्सन ( १९९४), सचिन तेंडुलकर ( १९९६), नासेर हुसैन ( १९९९) यांच्यावर ही नामुष्की ओढावली होती. बाबर बाद झाल्यानंतर शफिकने अर्धशतक पूर्ण केले, परंतु मथीशा पथिराणाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. शफिक ६९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.