Pakistan vs West Indies 2021: पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिज संघासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ट्वेंटी-२० मालिकेत आधीच ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या विंडीज संघावर पुन्हा कोरोना स्ट्राईक झाला आहे. त्यांच्या संघातील पाच सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता उर्वरित दौरा संकटात सापडला आहे.
आज पॉझिटिव्ह सापडलेल्या सदस्यांमध्ये तीन खेळाडू व दोन साहाय्यक प्रशिक्षकांचा समावेश आहे. यष्टिरक्षक-फलंदाज शाय होप, फिरकीपटू अकिल होसैन, अष्टपैलू जस्टीन ग्रिव्हेस या खेळाडूंसह साहाय्यक प्रशिक्षक रोड्डी इस्टविच व संघाचे फिजिशियन डॉ. अक्षाई मानसिंग यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे तीनही खेळाडू आता पुढील सामन्यांना मुकणार आहेत आणि या सर्वांना विलगिकरणात जावे लागणार आहे.
''वेस्ट इंडिजच्या अन्य सदस्यांपासून हे पाचही जण दूर विलगिकरणार राहतील. त्यांची काळजी घेतली जात असून त्यांच्यासोबत वैद्यकिय टीम आहे. पुढील १० दिवस ते विलगिकरणार राहतील आणि त्यांचा PCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच हा कालावधी संपेल,''असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं कळवलं आहे.
दौऱ्यावर आतापर्यंत एकूण ६ खेळाडूंनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे माघार घेतली आहे आणि देव्हॉन थॉमस यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. दोन्ही क्रिकेट बोर्ड आता पुढील मालिकेबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार आहेत.