Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक २०२३ हातातून जाऊ देण्याच्या तयारीत नाहीत. BCCI ने पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाठवणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली. त्यामुळे PCBचे अध्यक्ष नजम सेठी ( Najam Sethi) उठल्यासुटल्या बेताल वक्तव्य करत आहेत. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा वापरूनही BCCI ने भिक न घातल्याने आता पाकिस्तान बोर्डाने मोर्चा श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे वळवला आहे.
आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद स्वतःकडे राहण्यासाठी PCB ने हायब्रिड मॉडेल सुचवला. त्यानुळे भारताचे सामने तटस्थ ठिकाणी आणि अन्य संघांचे पाकिस्तानात असा पर्याय होता. पण, BCCI सह श्रीलंका व बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही त्याला विरोध दर्शवला. आता PCB ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला जुलैमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांवर बरिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. तेथील स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान श्रीलंकेत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. श्रीलंकेने आशिया चषकसाठी PCBच्या हायब्रिड मॉडेल नाकारला आणि त्यामुळे पाकिस्तान त्याचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता श्रीलंका दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. पीसीबी आणि SLCचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत, परंतु PCBने श्रीलंकेचा नकार दयाळूपणे घेतला नाही. कसोटी मालिकेवर बहिष्कार टाकल्यास SLCवर गंभीर परिणाम होईल. श्रीलंका अजूनही आर्थिक संकटातून सावरत आहे. तथापि, आशिया चषक देशात हलवल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेच्या भवितव्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केल्यास भारत सहभागी होणार नाही. श्रीलंका आणि बांगलादेश युएईला आपले संघ पाठवण्यास तयार नाहीत. पाकिस्तानशिवाय आशिया चषकाचे यजमानपदासाठी श्रीलंका हा पर्याय समोर आला आहे.