आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( आयसीसी) आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ऑक्टोबर-नोव्हेंबर येथे होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित करण्याचा कोणताही विचार नसून नियोजित वेळापत्रानुसार ती घेण्याचा मानस आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसे झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी ( बीसीसीआय) हा मोठा धक्का असेल.
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13 व्या मोसमासाठी बीसीसीआय 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या विंडोचा विचार करत आहे. पण, वर्ल्ड कप झाल्यास आयपीएल होणे शक्य नाही. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयपीएलसाठी बीसीसीआय ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यासाठी दबाव आणत असल्याचे वृत्त काही ऑस्ट्रेलियन मीडियानं प्रसिद्ध केलं होतं. बीसीसीआयनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.
आता या आरोपांत पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही उडी घेतली आहे. आयपीएलसाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांना पाकिस्तान क्रिकेट मंडळानं कडाडून विरोध केला आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''आता मे महिना सुरू आहे आणि वर्ल्ड कप साठी अजून बराच कालावधी आहे. कोरोना संकट जाण्याची आयसीसीनं वाट पाहावी. ही स्पर्धा घ्यायची की नाही, याचा निर्णय दोन महिन्याआधीही घेतला जाऊ शकतो.''
आलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा!
''सध्या कुठेच क्रिकेट स्पर्धा सुरू नाही, परंतु दोन महिन्यानंतर चित्र स्पष्ट होईल. नियोजित वेळापत्रकानुसार वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. आयपीएल ही बीसीसीआयची स्थानिक स्पर्धा आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धा किंवा द्विदेशीय मालिकेपेक्षा त्याला महत्त्व देता कामा नये. तसे होत असल्यास आमचा त्याला विरोध असेल,''असेही स्पष्ट करण्यात आले.