ICC ODI World Cup 2023 : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तान शेवटचा सामना जिंकेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पराभव पत्करून संघ वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला. बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघ विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार म्हणून स्पर्धेत उतरला होता. १९९२ च्या वर्ल्ड कप विजेत्याने सलग दोन सामने जिंकून त्यांच्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात केली. पण भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानची मोहीम खिळखिळी झाली आणि त्यातून त्यांना सावरता आले नाही.
शनिवारी इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वीच तो स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला होता. ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान पूर्ण ५० षटकेही फलंदाजी करू शकला नाही. २४४ धावांवर त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला. नऊ सामन्यांमधून ४ विजयांसह पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आपली मोहीम संपवली. पण संघाला आयसीसीकडून मोठी रक्कम मिळणार आहे.
पाकिस्तानला $2,60,000 म्हणजेच ७,३३,४१, ५८० पाकिस्तानी रुपये दिले जातील. ICC ने जाहीर केले होते की ते ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी संघाला $40,000 मिळतील. लीग टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांना $1,00,000 ची रक्कम मिळेल. पाकिस्तान चार सामने जिंकल्यास $1,60,000 आणि पहिल्या फेरीत बाहेर पडल्यास $1,00,000 मिळण्यास पात्र आहे. त्यानुसार पाकिस्तान कोट्यधीश झाला आहे.
उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना ६.६३ कोटी रुपयांची समान रक्कम मिळेल. यामध्ये लीग टप्प्यातील सामने जिंकण्यासाठी मिळालेल्या रकमेचा समावेश नाही. विजेत्यांना ३३.१७ कोटी रुपयांचा धनादेश मिळणार आहे. उपविजेत्याला १६.५८ कोटी रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे.