PAK vs AFG Live । चेन्नई : आज वन डे विश्वचषकात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. बाबर आझमचा संघ दोन पराभवानंतर इथे पोहचला आहे, तर अफगाणिस्तानने बलाढ्य इंग्लंडला नमवून पाकिस्तानच्या पोटात गोळा आणला आहे. पाकिस्तानी संघाला भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सलग दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे शेजाऱ्यांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी बाबर आझमच्या संघाला आज विजय मिळवणे गरजेचे आहे. पाकिस्तानची फलंदाजी विरूद्ध अफगाणिस्तानची फिरकी असा सामना पाहायला मिळू शकतो. आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेजाऱ्यांनी आज एक बदल केला असून शादाब खानला संधी मिळाली आहे, तर मोहम्मद नवाजला वगळण्यात आले आहे.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हारिस रौफ.
आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ - हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, इक्रम अलिखिल, मोहम्मद नबी, अझमतुल्लाह ओमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.
पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग
पाकिस्तानला उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी उरलेले सर्व पाच सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. एका सामन्यातील पराभवामुळे देखील पाकिस्तानचा खेळ बिघडू शकतो. उरलेले पाचही सामने जिंकल्यास पाकिस्तानचे एकूण गुण १४ होतील, ज्यामुळे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहील. दरम्यान, पाकिस्तानने ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवल्यास देखील पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. कारण ४ सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानचे गुण १२ होतील. मात्र, त्यासाठी पाकिस्तानला आपल्या नेटरनरेटमध्ये सुधारणा करावी लागेल.