icc World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वन डे विश्वचषक २०२३ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज नसीम शाहला दुखापतीमुळे विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले नाही. नसीमच्या जागी हसन अलीला विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. पाकिस्तानी संघ २९ सप्टेंबरला आपला पहिला सराव सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळेल.
दरम्यान, बाबर आझमचा संघ हैदराबादमध्ये ६ ऑक्टोबरला विश्वचषकातील आपला पहिला सामना नेदरलँड्सविरूद्ध खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन खेळाडूंना पाकिस्तानच्या विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. तीन खेळाडूंची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद हारिस आणि जमान खान यांचा समावेश आहे. तर अबरार अहमद देखील राखीव खेळाडू म्हणून संघाचा भाग असेल.
विश्वचषकासाठी संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक म्हणाला की, मागील काही दिवसांत आमचे खेळाडू खूप सामने खेळले आहेत. गेल्या एक वर्षापासून खेळत असलेल्या खेळाडूंनाच आम्ही संघात स्थान दिले आहे. आशिया चषकामध्ये आम्ही फक्त २ खराब सामने खेळलो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली पाहिजे. आमचे गोलंदाज मधल्या षटकांमध्ये बळी घेत नाहीत ही चिंतेची बाब आहे. संघ व्यवस्थापन याकडे लक्ष देत आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.