दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे घट्ट समीकरण बनले आहे. कोहली मैदानावर उतरला की विक्रम झालाच म्हणून समजा, असा ठाम विश्वास चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. कोहलीनेही आपल्या खेळीने तो सार्थ ठरवला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात असंख्य विक्रम त्याच्या नावावर आहेत. पण रविवारी त्याच्या नावावर असलेला एक विक्रम मोडला गेला आणि तोही पाकिस्तानच्या बाबर आझम याच्याकडून.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात बाबरने ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ३ बाद १६६ धावांची मजल मारली. त्याने या खेळीबरोबर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील वैयक्तिक १००० धावाही पूर्ण केल्या.
बाबरने २६ डावांत १००० धावांचा पल्ला ओलांडला. या कामगिरीसह त्याने कोहलीच्या नावावर असलेला विक्रम स्वत:च्या नावावर केला. कोहलीने सर्वात जलद म्हणजे २७ डावांत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा केल्या होत्या. तो विक्रम रविवारी बाबरने स्वतःच्या नावे केला.