Pakistan vs New Zealand Test Series : पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातली दोन कसोटी सामन्यांची मालिका अनिर्णीत राहिली. पहिल्या कसोटीत पाकिस्तानने कसाबसा पराभव टाळला, तर दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला यजमानांच्या अखेरच्या विकेटने तंगवले. त्यामुळे किवींना मालिका विजयापासून वंचित रहावे लागले. या दोन सामन्यांच्या मालिकेतून पाकिस्तान संघात तीन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या सर्फराज अहमदने ( Sarfaraz Ahmed) आपली छाप पाडली. त्याने मालिकेत सर्वाधिक ३३५ धावा केल्या आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. सर्फराजने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावताना पाकिस्तानचा पराभव टाळला.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ४४९ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४०८ धावा केल्या. किवींनी ५ बाद २७७ धावांवर दुसरा डाव घोषित करून पाकिस्तानसमोर ३१९ धावांचे लक्ष्य ठेवले. अब्दुल्लाह शफिक व मीर हम्झा यांना भोपळ्यावर माघारी पाठवून किवींनी पाकिस्तानची कोंडी केली. इमाम-उल-हक ( १२), शान मसूद ( ३५) व कर्णधार बाबर आजम ( २७) हेही अपयशी ठरले.सर्फराज अहमदने शतक झळकावताना पाकिस्तानला आशेचा किरण दाखवला. सौद शकिल ( ३२) व आघा सलमान ( ३०) यांनी त्याला उत्तम साथ दिली.
सर्फराज एकटा भिडत होता. त्याची ही फटकेबाजी पाहण्यासाठी पत्नीही स्टेडियमवर आली होती. सामना सुरु असताना नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला सर्फराज स्टेडियमवर उपस्थित पत्नीला पाहत होता. किवी गोलंदाजाने ते पाहिलं अन् क्रिजजवळ येताच तो थांबला. त्यानंतर त्याने खेळाकडे लक्ष दे असे सर्फराजला सांगितले.