नवी दिल्ली - क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अनेक खेळाडू सातत्याने चर्चेत असतात. यातील काही खेळाडू आपल्या विक्रमांमुळे चाहत्यांच्या मनात घर करून असतात. तर काही खेळाडू वादामुळे देखील चर्चेत राहतात. असेच एक नाव म्हणजे, पाकिस्तानचाशोएब अख्तर. रावलपिंडी एक्सप्रेस नावाने जगभरात ओळखल्या जाणाऱ्या अख्तरच्या नावावर जगातील सर्वाधिक वेगाने चेंडू फेकण्याच्या विक्रमाची नोंद आहे. याच शोएब अख्तरचा जीवनपट आता पडद्यावर झळकणार आहे.
सोशल मीडियावरून केली घोषणा शोएब अख्तरच्या जीवनावर आधारित एक बायोपिक प्रदर्शित होणार असून याचे नाव 'रावलपिंडी एक्सप्रेस' असेल, याची घोषणा अख्तरने केली. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट १६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अख्तरच्या जीवनातील कठीण प्रसंग आणि संघर्ष जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
"माझे जीवन आणि माझा बायोपिक लॉन्च करण्याची घोषणा करत आहे. 'रावलपिंडी एक्सप्रेस' पाकिस्तानी खेळाडूच्या जीवनावर आधारित असलेला परदेशी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे," अशा कॅप्शनसह एक व्हिडीओ पोस्ट करत, अख्तरने आपल्या बायोपिकची घोषणा केली.
४६ वर्षीय शोएब अख्तरने पाकिस्तानकडून १४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. १९९७ मध्ये क्रिकेट विश्वात पदार्पण केलेल्या अख्तरने २०११ साली क्रिकेटला रामराम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीने जगभरातील दिग्गज फलंदाजांना घाम फोडणाऱ्या रावलपिंडी एक्सप्रेसने ४६ कसोटी सामन्यांमध्ये १७८ बळी पटकावले आहेत, तर १६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४७ आणि टी-२० मध्ये १९ बळी घेतले आहेत. पाकिस्तानी खेळाडूबद्दलचा पहिला विदेशी चित्रपट रावलपिंडी एक्सप्रेसचा बायोपिक मोहम्मद फराज कैसर यांनी दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील खेळाडूच्या जीवनावरील हा पहिलाच विदेशी चित्रपट असणार आहे. या बायोपिकसह अख्तरचा एलिट यादीत समावेश झाला आहे. याआधी एलिट यादीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मिताली राज, मोहम्मज अझरूद्दीन आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांचा समावेश आहे.