मुंबई : खेळाडू हे प्रोफेशनल असतात, असे म्हटले जाते. पण खेळाडू हा सरतेशेवटी माणूस असतो. त्यालाही भावना असतात. या भावना कधी कधी अनावर झाल्या की डोळ्यांतील आसवांद्वारे त्या बाहेर पडतात. त्यावेळी आपल्या समोर कोण आहे, याचे भानही राहत नाही. असेच काहीसे झाले ते एका क्रिकेटपटूबद्दल, नेमके घडले तरी काय, जाणून घ्या...
आपल्या मुलाने मोठे क्रिकेटपटू व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. आईची ही इच्छा पूर्ण झाली. त्याला देशाकडून खेळण्याची संधी मिळाली. या क्रिकेटपटूने पाच विकेट्स काढत विक्रमही रचला. पण हे सारे पाहण्यासाठी त्याची आई या जगात नव्हती.
डिसेंबर महिन्यात या क्रिकेटपटूला देशाकडून खेळण्याची संधी मिळाली खरी, पण फक्त एका महिन्यापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले. या दु:खातून बाहेर पडणे सोपे नव्हते, पण आपल्या आईचे स्वप्न साकारण्यासाठी त्याने सारे काही बाजूला सारले आणि तो देशासाठी खेळायला सज्ज झाला.
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहची ही गोष्ट. अवघ्या १६ व्या वर्षी त्याला पाकिस्तानच्या संघात स्थान मिळाले. नसीमनेही संधीचे सोने केले. आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर त्याने पाच बळी मिळवण्याची किमया साधली आणि पाच बळी मिळवणारा सर्वात युवा गोलंदाज तो ठरला. यापूर्वी ही विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरच्या नावावर होता.
नसीमला आपली ही नेत्रदीपक कामगिरी आईला समर्पित करायची होती. पण त्याची आई या जगात नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारल्यावर नसीम भावुक झाला. त्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले आणि त्याचा बांध फुटला.