legends league cricket 2023: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सध्या कतार येथे लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि ज्यामध्ये भारतीय प्रेक्षकाच्या सांगण्यावरून भारताच्या तिरंग्यावर ऑटोग्राफ दिले होते. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी आफ्रिदीच्या कृतीने प्रभावित झाले होते. त्याने अनेकांची मन जिंकली होती, परंतु आता २४ तासांच्या आतच त्याने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
शाहिद आफ्रिदीने यापूर्वीही अनेकदा काश्मीरच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्याला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने सडेतोड उत्तर दिले आहे. पण, LLC मध्ये गंभीर व आफ्रिदी सोबत खेळताना दिसत आहेत. आफ्रिदीने भारतीच खेळाडूप्रती व्यक्त केलेला आदर पाहून त्याच्यात बदल झालाय असा अंदाज चाहते बांधू लागले होते. पण, सध्या सोशल मीडियावर आफ्रिदीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तो अप्रत्यक्षितपणे भारत सरकारला अत्याचारी म्हणतोय.
या व्हिडीओत एक पत्रकार आफ्रिदीला प्रश्न विचारतो की, तुम्ही भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे असं म्हणता, परंतु त्याचवेळी भारताचे पंतप्रधान व भारत सरकारवर टीका करता. मग क्रिकेट सामने कसं शक्य होतील? यावर आफ्रिदी म्हणाला,''जिथे अत्याचारी व्यक्ती असेल आणि तो कोणावर अत्याचार करत असेल मग तो कोणत्याची जाती-धर्माचा असेल मी त्याच्याविरोधात आवाज उठवणार. भारत असो किंवा पाकिस्तानात कुठेही अत्याचार होईल त्याविरोधात मी बोलणार.''
यानंतर पुढे प्रश्न विचारल्यावर त्याने मी इथे क्रिकेट खेळायला आलोय, त्यामुळे विषय भरकटू नका असेही तो म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"