नवी दिल्ली : पाकिस्तानचे क्रिकेटपटू सध्या चर्चेत आहे ते आपल्या वादग्रस्त विधानांमुळे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदवर अपशब्द वपारल्याप्रकरणी आयसीसीने कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानचा क्रिकेटपटू फखर झमानने मैदानात शिवी घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अहमदने फेलुक्वायोवर वर्णद्वेषी टीका केली होती. पाकिस्तानच्या 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे तीन फलंदाज 29 धावांवर माघारी परतले होते. युवा गोलंदाज शाहीन आफ्रीदीच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. पण, 5 बाद 80 अशा धावांवरून डुसेर आणि फेलुक्वायो यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या 37 व्या षटकात सर्फराजने केलेली वर्णद्वेषी टिप्पणी स्टम्प्समधील माइकमध्ये रेकॉर्ड झाली आणि वादाचा भडका उडाला.
सर्फराज ऊर्दूत म्हणाला होता की," अबे काले तेरी अम्मी आज कहाँ बैठी है? क्या पर्वाके आया है आज? ( तुझ्या आईने आज कोठे प्रार्थना केली की तू चांगली कामगिरी करत आहेस?)" सर्फराजचे हे वाक्य कॉमेंटेटर्सना कळले नाही आणि त्यांनी रमीझ राजाला अर्थ विचारला. त्यावर याचे भाषांतर करणे अवघड असल्याची सावध भूमिका रमीझ राजाने घेतली. पण आयसीसीने याप्रकरणी लक्ष घातले. आयसीसीने सुरुवातीला अहमदवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर अहमदवर चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला होता. चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे सोपवण्यात आली होती.
पाचव्या एकदिवसीय सामन्यात फखर आणि बाबर आझम हे दोघे फलंदाजी करत होते. त्यावेळी पाकिस्तानची 1 बाद 60 अशी अवस्था होती. त्यावेळी कागिसो रबाडाच्या चेंडूवर फखर फसला. रबाडाचा चेंडू वेगाने येईल, असे वाटत होते. पण चेंडू संथपणे आला आणि फखरच्या खांद्याला लागला. त्यानंतर फखरने अपशब्दाचा प्रयोग केला. फखरने नेमका कोणता अपशब्द वापरला ते या व्हिडीओमध्ये पाहा...